दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पंचायत समिती, सातारा व इंडियन मेडिकल असोसिएशन व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हास्तरीय मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
या आरोग्य मेळाव्यात तज्ञांमार्फत रोग निदान करुन उपचार केले जाणार असून एक्सरे, ई.सी.जी व विविध प्रकारच्या रक्त चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. या आरोग्य मेळाव्यामध्ये खासगी रुग्णालयातील विशेषोपचार तज्ञ (स्पेशालिटी) व अति विशेषोपचार तज्ञ (सुपर स्पेशालिटी) उपस्थित राहून रुग्णांना सेवा देणार आहेत.
आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत ई कार्ड, गोल्डन कार्ड नोंदणी करुन देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत पत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड या मुळ कागदपत्रांबरोबर मोबाईलसह उपस्थित रहावे, असेही आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.