कोविड १९ – इन्फलुएंझा ‘ए’ बाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२३ | फलटण |
राज्यासह जिल्ह्यात सध्या कोविड १९ / इन्फलुएंझा ‘ए’ चे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनीही मास्क वापरणे अनिवार्य केले आहे; परंतु अजूनही काही लोक मास्क वापरण्याबाबत चालढकल करून स्वत:बरोबरच दुसर्‍यांचा जीवही धोक्यात आणत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून कोविड १९ / इन्फलुएंझा ‘ए’ बाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, ‘इन्फलुएंझा’ हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फलुएंझा टाईप ‘ए’चे उपप्रकार – एच १ एन १, एच २ एन २, एच ३ एन ३ इ. आहेत. इन्फलुएंझा आजारात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया इ. लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात. इन्फलुएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यत: लक्षणाधारित आहे. आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी व लक्षणानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येतो.
इन्फलुएंझाबाबत शासनाकडून आतापर्यंत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात आली आहे. त्यानुसार कोविड १९ / इन्फलुएंझा ‘ए’ बाबत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना ‘व्हीसी’ द्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

फ्ल्यूसद़ृश रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येतो. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध आहे. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी डॉक्टरांची क्लिनिकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुनर्प्रशिक्षण ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आले.

दि. १७ मार्च २०२३ रोजी पुनर्प्रशिक्षण घेण्यात आले आहे. दि. ६ मार्च २०२३ रोजी राज्यस्तरावरून सर्व जिल्ह्यांना सर्वेक्षण, प्रतिबंध व उपचारांबाबत मार्गदर्शक लेखी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

डेथ ऑडीट करणेबाबत राज्यस्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू प्रतिबंधासाठी आयईसीचे प्रोटोटाईप देण्यात आले आहे.

शासन कोविड १९ / इन्फलुएंझा ‘ए’ बाबत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करत असून नागरिकांनी न घाबरता इन्फलुएंझा ‘ए’ बाबत वरील लक्षणे दिसल्यास त्वरित तालुका, जिल्हा आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!