जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची ’व्हाट्सप चॅट बॉट’ सेवा कार्यान्वित

संतोष पाटील ; आपत्तीविषयक माहिती मिळविण्यासाठी डिजिटल सुविधेचा लाभ घेण्याचेे आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. 30 सप्टेंबर : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयी सुविधा वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा ’व्हाट्सप चॅट बॉट’ तयार केला आहे. या अत्याधुनिक डिजिटल सुविधेच्या माध्यमातुन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयाच्या विविध प्रकारच्या सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरीकांसाठी ही अनोखी संकल्पना अस्तित्वात आणली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना आपत्ती विषयी माहिती त्वरीत मिळणेसाठी हि सेवा ऑनलाईन केली आहे. आता नव्याने आणलेल्या ’व्हाट्सप चॅट बॉट’ सुविधेसाठी नागरिकांना 9309461982 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सप संदेश पाठवावा लागणार आहे. त्यानंतर, आवश्यक सेवा पर्याय उपलब्ध होऊन त्वरित कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे ते विचारण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

’व्हाट्सप चॅट बॉट’च्या माध्यमातून सातारा जिल्हयातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात 10 सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये पर्जन्यमानबाबत माहिती, धरण पातळी, नदी/पूल पाणी पातळी, रस्ते बाबत स्थिती, हवामान अंदाज, महत्वाची माहिती अथवा संदेश, नकाशे, आपत्ती दरम्यान काय करावे व काय करू नये, आपत्कालीन संपर्क व हेल्पलाईन, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणार्‍या सेवा इत्यादींची माहिती नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभसेवा मिळाव्यात यासाठी ’व्हाट्सप चॅट बॉट’ ही सुविधा विकसित केली आहे. या सेवेमुळे वेळ वाचून प्रशासनाची गती वाढेल आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. ’व्हाट्सप चॅट बॉट’ सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाचे आहेत. नागरिकांच्या सुचना व तांत्रिक सुधारणा लक्षात घेऊन सेवेत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

डिजिटल सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

डिजिटल युगात जिल्हा प्रशासनाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवांचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालय साताराचा ’व्हाट्सप चॅट बॉट’ हा त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी या सुविधेचा प्रभावीपणे वापर करावा.
– संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा


Back to top button
Don`t copy text!