दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयानुसार जिल्ह्यातील सर्व एसटीस्टॅन्डवरील स्वच्छतागृहाची वेळावेळी स्वच्छता झाली पाहिजे. विद्युत तारा तुटून विद्युत प्रवाहामुळे ज्या नागरिकांचा मृत्यु झाला आहे, अशा नागरिकांच्या अर्थसहाय्याची प्रकरणे तातडीने मंजूर करावीत. तालुकास्तरावरील प्रश्न सुटण्यासाठी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात ग्राहक सरंक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी उपस्थित राहून तालुकास्तरावरील प्रश्न मार्गी लावावेत.
स्वस्त धान्य दुकानातून दिपावली सण साजरी करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात वस्तु देण्यात येणार आहेत. त्याचे योग्यरित्या वाटप होते की नाही याची सदस्यांनी तपासणी करावी. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांचा यांचे प्रमाण जास्त आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी पोलीस विभागाच्या सायबर सेलच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केल्या.