स्थैर्य, सोलापूर, दि.२७: कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय करण्यात आली आहे. या हॉस्पिटलचे शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
उद्घाटन समारंभाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत.
कोविड हॉस्पिटलमध्ये 50 बेडपैकी 16 बेड आयसीयूमधील राहणार आहेत. अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर उपचार होणार आहेत. 10 बेड इतर नागरिकांना राखीव ठेवण्यात आले आहेत. कोविड हॉस्पिटलच्या कामासाठी सामाजिक संस्थांचा सीएसआर फंड आणि महसूल कर्मचारी संघटनेने निधी उभा केला आहे. यातूनच हॉस्पिटल उभे राहत असून याठिकाणी नाष्टा, जेवणाची सोय सामाजिक संस्था करणार आहेत. बेडची व्यवस्था आवादा ग्रुपचे विनित मित्तल यांनी केली तर मंडप, नाईट आणि फॅनची सोय श्रवंती मंडप आणि इलेक्ट्रीक डेकोरेटर्सचे पुरूषोत्तम सग्गम यांनी केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.
याठिकाणी पाच डॉक्टर, 15 परिचारिका, 15 सफाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधीमधून कोविड हॉस्पिटलच्या औषधांचा खर्च करण्यात येणार आहे. या कल्याण निधीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे असून सचिव जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आहेत.