दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । सातारा । महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यातील 5 शासकीय व 21 खाजगी असे एकूण 26 रुग्णालयामध्ये राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 हजार 900 पेक्षा जास्त कोविड-19 रुग्णांना उपचाराचा मोफत लाभ देण्यात आला आहे. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 996 आजार व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 231 असे एकूण 1209 आजारांवर उपचार केले जातात. याबाबतचा सविस्तर आढावा नुकताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी योजनेविषयीची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात फलक तयार करुन लावण्याच्या सूचना रुग्णालयांना दिल्या. यामध्ये योजनेच्या पात्रता व अटी व कोविड अंतर्गत 20 वेगवेगळ्या पॅकेजसुचिंचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. तसेच बेड उपलब्धता, इतर योजनेंतर्गत असणारी बेड संख्या व रिक्त बेड यांची दैनंदिनी दर्शनी भागात लावावे. रुग्णांच्या मदतीकरिता आरोग्यमित्र व वैद्यकीय समन्वयक यांचे नांव व मोबईल नंबर यांची माहितीही लावण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
रुग्णालयात रुग्णांनी भरती होतांना अद्ययावत मुळ प्रत रेशन कार्ड व ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड,पॅन कार्ड पैकी एक) घेऊन यावे. काही अडचण असल्यास रुग्णालयाच्या वैद्यकीय समन्वयक यांनी रुग्णाचा इ.टी.आय. घेण्यात आल्यानंतर 72 तासांत अद्ययावत मुळ प्रत रेशन कार्ड व ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड,पॅन कार्ड पैकी एक) रुग्णलयाला देणे बंधनकारक आहे. अन्यथा रुग्णांना या योजनेचालाभ घेता येणार नाही असे सांगुन पुढील येणाऱ्या कोविड-19 /ओमायक्रॉन साथी विषयी तयारी करण्याच्या सूचनाही संबंधित रुग्णालय व्यस्थापकांना दिल्या. तसेच रुग्णालयांच्या तक्रारींचा आढावा घेऊन, रुग्णालयांना रुग्णांसदर्भातल्या तक्रारी पुढील दोन आठवड्यात निराकरण करुन त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सातारा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची यादी पुढील पुढीलप्रमाणे.
सातारा तालुका : जिल्हा कोविड रुग्णालय सातारा, शासकीय रुग्णालय सातारा, संजीवन हॉस्पिटल सातारा, ऑक्नोलाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे, यशवंत हॉस्पिटल, श्रीमंगलमुर्ती हॉस्पिटल.
कराड तालुका : उपजिल्हा रुग्णालय कराड, शारदा क्लिनिक ॲण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल ॲण्ड मेडीकल रिसर्च सेंटर, सह्याद्री हॉस्पिटल, कोळेकर रुग्णालय, के. एन. गुजर रुग्णालय.
कोरेगाव तालुका : ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, श्रीरंग नर्सिंग होम रुग्णालय.
फलटण तालुका : उपजिल्हा रुग्णालय फलटण, निकोप हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, चिरंजीवन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर,
खंडाळा तालुका : मानसी मेमोरियल हॉस्पिटल खंडाळा, सावित्री हॉस्पिटल लोणंद.
वाई तालुका : गितांजली हॉस्पिटल, घोटवडेकर हॉस्पिटल.
वडुज तालुका : बी. जे. काटकर हॉस्पिटल, चारुशिला ॲक्सिडेंट हॉस्पिटल ट्रौमा केअर हॉस्पिटल वडूज,
माण तालुका : डोलताडे हॉस्पिटल, धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हसवङ
महात्मा फुले जनआरोग्य योजनेकरता पात्रताधारक लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता अद्ययावत मुळ प्रत रेशन कार्ड व ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड,पॅन कार्ड पैकी एक) व आयुष्यमान भारत करिता गोल्डन कार्ड व अद्ययावत मुळ प्रत रेशन कार्ड व ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड,पॅन कार्ड पैकी एक) रुग्णांकडून उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच पिवळे, केशरी हे लाभार्थी असुन पांढरे रेशन कार्डधारकांचा योजनेंतर्गत मुदतवाढ तसेच कायम ठेवण्यात आले आहे.