दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्हा कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत त्या प्रभावीपणे राबवून गरजु शेतकऱ्यांपर्यंत लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, तंत्र अधिकारी (सांख्यिक) संतोषकुमार बरकडे यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे बँकांकडे अर्थसहाय्यासाठी प्रकरणे आली आहेत ही प्रकरणे प्राधान्याने मंजूर करावीत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, पंतप्रधान पिक विमा योजना पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकरी कसे सहभागी होतील यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. यासाठी गावनिहाय शिबीरांचे आयोजन करावे.
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा मृत्यु झाला आहे त्यांनाही या अपघात विम्याचा प्राधान्याने लाभ द्यावा, अशाही सूचना यावेळी केल्या.
या वेळी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे व नाबार्डने तयार केलेल्या संभाव्यतायुक्त ऋण योजना 2022-23 पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.