स्थैर्य, फलटण, दि. २९ : विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या होत्या. फलटण येथील जम्बो कोव्हीड हॉस्पिटलचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता. त्याच अनुषंगाने फलटण येथील जम्बो कोव्हीड हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेची पाहणी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेली आहे. फलटण – पुणे रोडवरील वडजल गावच्या हद्दीमधील तांबमाळ येथे असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या बाबत लवकरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या वेळी दिले.
या वेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फलटण येथे वडजल गावच्या हद्दीमधील तांबमाळ येथे असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यासाठी तेथे पाण्याची, स्वच्छतागृहांची व व्हेंटिलेशन साठी सोयी सुविधा करणे गरजेचे आहे. या सर्व सुविधा तातडीने कराव्यात व जम्बो कोव्हीड हॉस्पिटल मध्ये आगामी काळामध्ये प्रस्तावित पेक्षा जादा बेड्स वाढवण्याची गरज भासली तरी सुद्धा त्याची तरतूद करण्यात यावी, असे निर्देश या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात यावे. फलटण तालुक्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी फलटण येथे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल असणे हे गरजेचे आहे. त्या साठीचा दाखल केलेल्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर जम्बो कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात यावे, असे या वेळी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.