कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 27 ते 31 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 26 : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधीबाबत असून आज 27 जुलै पासून 31 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे जारी केले आहेत.

ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेन्मेंट झेन जाहिर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभगीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील  व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हा आदेश कंटेन्मेंट झोन वगळता  सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झेन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर या क्षेत्रात हे आदेश  लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबती प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील.

सातारा जिल्ह्यात खालील आस्थापना अंशत: बंद करण्यात येत आहेत

● केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा सर्व किराणा दुकाने दि.27/07/2020 ते दि.31/07/2020 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.

● उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (शिवभोजन थाळी, वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स स्टाफ नर्स साठी यांचे निवासकामी असलेली हॉटेल, इन्स्टिटयुशनल कॉरंटाईन साठी घेतलेले हॉटेल व इतर इमारती वगळून) रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील.

● वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना, तसेच मदयाची घरपोच सेवा दि. 27/07/2020 पासून 27/07/2020 ते दि. 31/07/2020 या कालावधीत फक्त घरपोच सुविधा चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.

● ZOMATO, SWIGY, DOMINOS व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा तसेच हाॅटेल रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा दि. 17/07/2020 पासून ते 22/07/2020 पर्यंत पुर्णत: बंद राहतील. तद्नंतर दि. 27/07/2020 ते दि. 31/07/2020 या कालावधीत घरपोच सेवा सुरु राहील.

● सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morming Walk व Evening Walk करणेस प्रतिबंध राहील.

● सर्व केश कर्तनालय, सलुन/स्पा/ब्यूटी पार्लर दुकाने संपुर्णतः बंद राहतील.

● सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार/ फेरीवाले हे सर्व ठिकाणे दि. 27/07/2020 ते दि. 31/07/2020 पर्यंत सकाळी सकाळी 9 ते दु. 2 या कालावधीत चालू राहतील.

● मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दि. 27/07/2020 पासून दि.31/07/2020 या कालावधीत सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत चालू राहतील.

● शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील,

● सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील, तथापि अत्यावश्यक सेवेनील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करिता व वैदयकीय कारणास्ताव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापरास परवानगी राहील,

● सार्वजनिक प्रवासी वाहतूकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व परवानगी घेऊन चालू असलेल्या उदयोगातील अधिकृत कर्मचारी यांचेसाठी परवानगी राहील. तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक असलेल्या उपाययोजनांचे काम करणारे सातारा जिल्ह्यातील महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी कर्मचारी तसेच राज्य व केंद्र विभागाचे विनिर्दीष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक वस्तु यांचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतुक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.

● सर्व प्रकारची खाजगी बांधकाम्/कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासनाची शासकीय कामे चालू राहतील.

● सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलरतरण तलाव करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह संपुर्णतः बंद राहतील.

● सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र दिनांक 14/07/2020 पुर्वी परवानगी घेण्यात आलेले खाजगी जागेतील व मंगल कार्यालयातीन लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील

● सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील

● धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ / सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.

● E-COMMERCE सेवा उदा. AMAZON, FLIPKART व यासारख्या तत्सम सेवा दि.27/07/2020 ते दि. 31/7/2020 या कालावधीत सकाळी 9 ते दु,2 वाजेपत चालू राहतील.

सातारा जिल्ह्यात खालील अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील

● दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी. 6 ते. 10 या कालावधीत सुरु राहील.

● सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी निगडीत सेवा आस्थापना पशुचिचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरु राहतील. कोणतही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेवून रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही.

● सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9 ते दु. 2 या वेळेत चालू रहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषधांची दुकाने 24 तास कालावधीकरीता सुरु राहील.

●  सर्व न्यायालये, व राज्य शासनाचे/केंद्र शासनाने कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वत:चे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.

● पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी. 9 ते सायं 6 या वेळेत सुरु राहतील. शासकीय वाहने, वैदयकीय सुविधा पुरवणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहन, कृषी व्यवसायाशी निगडीन सर्व यंत्र व वाहने, कार्यरत असलेले उद्योग व औद्योगिक आस्थापनेशी संबंधित वाहने, सर्व प्रकाशी माल वाहतूक वाहने, वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित वाहने व शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेली वाहने यांना इंधनपुरवठा करावा.

● एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरु राहील.

● निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.

● औदयोगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहील.

● दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये सुरु राहील.

● पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील.

● संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरण व कोविड केअर सेंटरकरीता ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयांच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.

● सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गांव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी, एलआयसी कार्यालय किमान मनुष्यबळासह सकाळी 9 ते दु, 2 या कालावधीत सुरु राहतील. बँकांच्या इतर ग्राहकसेवा (उदा ऑनलाईन, एटीएम इत्यादी सारख्या) सुरु राहतील.

● न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, न्यायाधीश, वकील, शासकीय केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा, कर्मचारी, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा- कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे व औषधाचे दुकान, खते, व गॅस वितरक पाणी पुरवठा, आरोगय व स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्यक काम करणारे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, पोस्ट विभागाचे कर्मचारी, दुरसंचार विभाग तसेच कंटेन्मेंट झोनरकरीता नियुक्त कर्मचारी यांनाच दुचाकी, चारचाकी (स्वत:करिता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील.  या सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी स्वत:चे कार्यालयात ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांना स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवणे व वाहनाचे आवश्यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वाहन वापरता येईल.

● औषध व अन्न उत्पादन सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्यांचे पुरवठादारी नियमानुसार चालू राहतील व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरुन देण्यात आलेल्या परवानग्या ग्राहय धरण्यात येईल.

● एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील सध्या चालू असलेले सर्व औदयोगिक आस्थापना चालू राहतील. तसेच या आस्थापनांसाठी जाण्यासाठी आणि परतीसाठी दोन चाकी व चार चाकी वाहन किंवा जिल्हयाबाहेरील कर्मचा-यांसाठी निश्चित केलेल्या बसमधूनचे प्रवासाला परवानगी राहील. (दोन चाकी वाहनांस एक व्यक्ती, चार चाकी वाहनांमध्ये 3 व्यक्ती व बसमध्ये प्रवासी क्षमतेच्या 50% मर्यादेपर्यंत परवानगी राहील) तथापि त्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. यापूर्वी बाहेरील जिल्हयातील कर्मचारी यांची औदयोगिक आस्थापनेसाठी वाहतूक करणेबाबत चालू असलेली वाहन व्यवस्था चालू राहील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तींनाच कामावर उपस्थित राहता येईल.

● सातारा जिल्ह्यात सुरु असलेले राष्ट्रीय प्रकल्प व शासकीय कामे सरु राहतील.

● माहिती तंत्रज्ञान उदयोग 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येतील. शक्य असल्यास WORK FROM HOME चा पर्याय वापरण्यात यावा. मात्र कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. सदर आस्थापनेमधील कार्यरत कामगार अधिकारी संबंधित आस्थापनेच्या एचआर विभागप्रमुख यांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरीता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनीकडून निर्गमित  करण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस आधिक्षक सातारा व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सादर करावी. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अधिकारी /कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहता येईल.

● शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता राहील.

● कृषी सेवा केंद्र/बि-बियाणे/खते/किटकनाशक दुकाने/चारा दुकाने ही सर्व दुकाने सकाळी 9.00 ते दु, 2.00 या कालावधीत चालू राहतील, शेतमालाची कृषी निगडीत प्रक्रिया उदयोग सुरु राहतील. सर्व प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी राहील. सदर आस्थापनेमधील कार्यरत कामगार अधिकारी संबंधित आस्थापनेच्या एचआर विभागप्रमुख यांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर निर्गमित करावा. त्याकरीता त्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. कंपनीकडून निर्गमित  करण्यात आलेल्या परवान्याची माहिती पोलीस आधिक्षक सातारा व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सादर करावी. तथापि ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अधिकारी /कर्मचारी यांना कामावर उपस्थित राहता येईल.

● वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.

● सर्व वैद्यकीय, व्यावसायिक, परिचारीका, पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ॲब्म्युलन्स यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेणेची आवश्यकता नाही.

● केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेले कोविड 19 च्या आस्थापना बाबतचे निर्देशाचे पालन कर बंधनकारक आहे. सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत सर्व अधिकारी/ कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्याची खात्री करावी व आरोग्य सेतू ॲप नियमित अदययावत करणेबाबत सूचित करावे.

● या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते कृत्य सद्दहेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 में कलम 73 नुसार कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही.

● उपरोक्त नमूद ठिकाणे, संबंधित व्यक्ती, आस्थापना, मालक/चालक/आयोजक/व्यवस्थापक/कार्यालये इत्यादी यांना प्रत्येकास स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. 

आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860 ) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी असे आदेशात नमुद आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!