सातारा जिल्ह्यातील सलून्स, ब्युटी पार्लर दुकाने अटी व शर्तींवर सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 27 : राज्य शासनाच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व केशकर्तनालय/सलून दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा यांना सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.  नाभिक दुकाने व ब्युटीपार्लरमध्ये  सेवा देणाऱ्या ग्राहकाला सेवा देताना मास्क लावता येत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

या आदेशान्वये फक्त केशकर्तन करणे, केसांना डाय करणे, वॅक्सींग, थ्रेडींग इ. साठीच परवानगी राहील. तथापि त्वचेशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी राहणार नाही.

केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर दुकानामध्ये कारागीर व ज्या व्यक्तीचे केशकर्तन करावयाची आहे अशी एकच व्यक्ती दुकानामध्ये असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.

सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या  व्यक्ती व कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड कायमस्वरुपी घालणे बंधनकारक आहे. तसेच हातामध्ये ग्लोज घालणे व ॲप्रण घालणे बंधनकारक राहील.

सलून दुकानामध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे (उदा. खुर्ची व इतर अनुषंगिक साहित्य) निर्जंतुकीकरण करणे बंधनकार राहील.

एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. यासाठी एकदा वापरुन झाल्यावर विल्हेवाट लावता येईल असे टॉवेल किंवा नॅपकिन इ. ची उपलब्धता करुन वापर करावा. त्यासाठी ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी. 

काही सलून अथवा व्युटी पार्लरमध्ये फेस वॉशसाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्याचे वाफेत रुपांतर करण्याचे मशीन वापरले जाते. या मशिनवर लोखंडी किंवा स्टीलचे असलेली हत्यारे निर्जंतुकीकरण करता येईल. बाकीची हत्यारे ही सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुकीकरण करावे.

दुकानामध्ये येणाऱ्या लोकांनी, दुकानाबाहेरील लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक राहील. 

दुकानातील भूपृष्ठभागाचे दर 2 तासांनी सॅनिटाईज करणे बंधनकारक राहील.

सुरक्षा आदेशाचे  उल्लंघन केल्यास पाचशे पासून 2 हजारापर्यंत दंड

दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित दुकानधारकावर कडक कारवाई करण्यात येईल. दुकानामध्ये काम करणाऱ्या कारागीराने चेहऱ्यावर मास्क परिधान न केल्यास संबधित व्यक्तीवर रु. 500/- दंड आकारण्यात येईल तसेच दुकानामध्ये एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.

या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारण्याता येईल व  तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!