दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष आरोग्य शिबीर नवरात्र उत्सवापासून दि. 26 सप्टेंबर ते 26 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया लाभ यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणु समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधशिन पवार व समितीचे सदस्य उपस्थित होते.
या शिबीरादरम्यान सर्व माता, गरोदर स्त्रिया यांची प्रामुख्याने तपासणी करावी. प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केल्या.
सातारा जिल्ह्यातील 400 उपकेंद्रे, 84 प्राथमिक आरोग्य केंद्र, 18 उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सेवा दिल्या जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी बैठकीत सांगितले.