दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । सातारा । खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कास पठारावर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कास महोत्सावाचे दि. 7 ते 9 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचा सांगता कार्यक्रम जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि परिसरातील ग्रामपंचायतींचे सदस्य,ग्रामस्थ, कलाकार आणि पर्यटक यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी श्री. जयवंशी म्हणाले, कास परिसरात सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात फुलांचा हंगाम असतो. यावेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु येथे वर्षभर पर्यटक यावा यासाठी कास परिसरातील ग्रामस्थ व वन विभाग यांच्याशी चर्चा करुन शासनाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल.
कास महोत्सवाचे आयोजन करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्यातून कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कमी कालावधीत विविध विभागांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले. कास परिसरात पर्यटन वाढीसाठी कास महोत्सवासारखेच विविध उपक्रम राबविणार असल्याचेही श्री. जयवंशी यांनी सांगितले.
या महोत्सवात उमेद अभियानाच्या माध्यमातून परिसरातील 13 गावातील 42 बचत गटांनी तसेच सातारा जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण उत्पादन करत असणाऱ्या 18 बचत गटांनी सहभाग घेतला होता. या बचत गटांच्या स्टॉलला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला. या तीन दिवसात महाराष्ट्रातील नामवंत मराठी कलाकरांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा पर्यटकांसह स्थानिकांनी मनमुराद आनंद घेतला.