दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२३ | सातारा |
येत्या काही दिवसात सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देऊन विभाग प्रमुखांशी चर्चा करून जिल्ह्याची बलस्थाने आणि समस्या व एकंदर परिस्थिती यांचा अभ्यास करणार आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढ, आरोग्य सुविधांसह शासनाचे विविध उपक्रम राबवणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
सातारा जिल्हाधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या डुडी यांनी आपल्या पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डुडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देवून विभागप्रमुखांकडून प्रश्नांची माहिती घेणार आहे. जिल्ह्याचे बलस्थान कोणते आणि कमकुवत बाबी, समस्या यांचा अभ्यास करून त्यानुसार निर्णय घेणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना देताना निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
जिल्ह्यात आरोग्य सुविधेचे प्रश्न असल्याचे विचारले असता डुडी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट बनविण्यात चांगले यश आले आहे. या अनुभवाचा उपयोग करून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यावर भर देणाार आहे. आरोग्य केंद्रातील औषधांचा साठा समजेल, अशी यंत्रणा कार्यान्वीत केली जाईल.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी राबवलेली अतिक्रमण मोहिम पुढे राबवणार का, याबाबत विचारले असता, आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यवाहीचा अभ्यास करणार आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे डुडी यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याच्या सातार्यातील सर्व मुक्कामांच्या ठिकाणी वारकर्यांना पाणी, शौचालय यासह सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आपद्कालीन स्थितीपेक्षा २१ आरोग्य पथके, रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे.
जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू होऊ नयेत, यासाठी वनअधिकारी यांच्याशी बैठक लावून उपाय योजना करणार आहे. कास परिसरातील सखोल माहिती घेवूनच बेकायदा अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करणार, असेही डुडी यांनी सांगितले.