स्थैर्य, सातारा, दि. ०३ : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच (भटजी, वाजंत्री, स्वंयपाकी, वाढपी सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील. लग्न समारंभाच्या आगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून संबंधीत तहसीलदार यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. फक्त मंगल कार्यालयामध्ये (हॉलमध्ये) सनई-वाद्यास परवानगी राहील. याव्यक्तीरिक्त ज्या ठिकाणी लग्न कार्य आहे अशा मंगल कार्यालयाच्या बाहेरिल परिसरात अथवा आवारात कोणत्याही प्रकारचे बॅन्जो-बँड, डिजे अथवा फटाके वाजविण्यास पूर्णपणे मनाई राहील. संपूर्ण लग्न समारंभात वधु व वर या दोन्ही पक्षाकडील आणि उर्वरीत सर्व नागरिकांना पूर्ण वेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील.
मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. लग्न समारंभास 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती (मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार) व्यक्तीस लग्न कार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापी सख्ख्या रक्त नात्यातील आजी व आजोबा इत्यांदींना उपस्थित राहण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेसॉट, लॉन्स, मंगल कार्यालये इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथमवेळी 25 हजार रुपये दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास 1 लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल व संबंधित कार्यक्रम आयोजांकडून 10 हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
आदेशातील सर्व अटी व शर्थींचे पालन न करणारी संस्था/कार्यालय अथवा कोणतीही व्यक्ती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1987 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येवून नियमानुसार योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.