जिल्हा बँकेतर्फे साहित्य संमेलनासाठी 25 लाखाचे आर्थिक सहाय्य


स्थैर्य, सातारा, दि. 18 नोव्हेंबर : तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातार्‍यात पाचव्यांदा होणार्‍या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातारा जिल्हा बँकेने संमेलनास 25 लाख रुपयांचे भरीव आर्थिक सहाय्य केले आहे. बँकेचे संचालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच बँकेचे संचालक मा. श्री. प्रभाकर घार्गे, श्री. दत्तात्रय ढमाळ, मा. श्री. सुनील खत्री, मा. श्री. रामराव लेंभे, मा. श्री. सुरेश सावंत, मा. श्री. लहुराज जाधव, मा. सौ. कांचन साळुंखे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, श्री. विजयकुमार सावंत यांचे प्रमुख उपस्थित संमेलनाचे कोषाध्यक्ष व पुण्यनगरी दैनिकाचे मुख्य संपादक श्री. विनोद कुलकर्णी आणि साहित्य संमेलनाचे समिती सदस्य श्री. राजेश जोशी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

सातार्‍यात पाचव्यांदा होणार्‍या या ऐतिहासिक साहित्य सोहळा सातार्‍यामध्ये संपन्न होत असल्याने या संमेलनास सातारा जिल्हा बँकेने आर्थिक स्वरुपात विशेष सहकार्य केले आहे. 1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली सातार्‍यात पहिले संमेलन झाले होते. त्यानंतर 1905, 1962,1965 आणि 1993 साली सातारा येथे मराठी साहित्य संमेलन झाले होते. 1993 साली झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मंत्री अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज हे होते तर आता ही संधी बँकेचे संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्राप्त झाली ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी धनादेश सुपूर्द करताना अशा महत्त्वपूर्ण सोहळ्याला सातार्‍याच्याच प्रमुख आर्थिक संस्थेकडून मिळालेले भरीव सहकार्य संमेलनाचे आयोजन अधिक प्रभावी आणि यशस्वी करण्यासाठी मोलाचे ठरेल असे सांगून जिल्हा बँकेच्या या विशेष सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील म्हणाले, सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागताध्यक्षते खाली पार पडणार आहे ही बाब संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. बँकिंग कामकाजाबरोबर जिल्हयातील विकासाभिमुख कामात बँक नेहमीच अग्रेसर असून बँकेच्या मा. संचालक मंडळाने साहित्य संमेलनास रक्कम रु. 25 लाखाचा धनादेश देऊन छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रंगी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून यापूर्वीही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध मार्गाने आणि विविध कारणासाठी मदत केली आहे. बँकेकडून साहित्यिक परंपरेला जपण्यासाठी साहित्य संमेलनास रक्कम रु. 25 लाख देऊन बँकेने हे सिद्ध केले आहे की, सातारा जिल्हा बँक केवळ एक वित्तीय संस्था नसून, समाजाप्रती जबाबदारी जपणारी संस्था आहे. श्री. विनोद कुलकर्णी आणि श्री. राजेश जोशी यांनी बँकेचे मा. संचालक मंडळाचे संमेलनासाठी आवश्यक असलेल्या या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!