स्थैर्य, सातारा, दि.०८: संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या वर्षात 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला असून निव्वळ नफा 65 कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. रामराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, शिवरुपराजे नाईक-निंबाळकर, अनिल देसाई, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, शेतकर्यांची बँक तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख व ख्याती संपूर्ण देशात आहे. बँकेला चालू आर्थिक वर्षात 149 कोटी 22 लाख कर पूर्व नफा झालेला आहे. बँकेने या वर्षामध्ये आगाऊ आयकर रु. 23 कोटी 63 लाख भरणा केला आहे, शासन व्याज येणे रू. 14 कोटी 59 लाख जमा केले आहे व सोसायटी सक्षमीकरण व्याज रिबेट रु. 3 कोटी 63 लाख इतका खर्च होवून करोत्तर नफा रु. 107 कोटी 36 लाख झाला आहे. बँकेच्या ठेवी 8577 कोटी 56 लाख तर 5562 कोटी 76 कर्जे असून संमिश्र व्यवसाय 14140 कोटी 32 लाख इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सरकारी कर्जरोखे आणि बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक 3975 कोटी 69 लाख केली असून 23 कोटी 63 लाख आयकर भरला आहे. तसेच बँकेचा एनपीए केवळ 0.17 टक्के असून निव्वळ अनुत्पादक कर्ज गत 13 वर्षे शुन्य टक्के आहे.
आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले की, बँकेने शेतकरी सभासदांसाठी विविध तरतुदी व योजना केल्या आहेत. 1 ते 9 लाख पर्यंतच्या पिक कर्जावर दोन टक्के व्याज परतावा देण्यासाठी 6 कोटी 50 लाखाची तरतूद केली आहे. नियमीत कर्ज परतफेड कर्जदार सभासदांच्या अल्पमुदत कर्जावर दहा वर्षांपासून बँक परतावा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी दिलेल्या शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी 1 कोटी 1 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे शिक्षण कालावधीत शैक्षणिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने प्राप्त होत असून अशा प्रकारचे कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक ही देशातील एकमेव बँक असल्याचेही त्यांनी सांगितले.