दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खरेदी विक्री संघ मतदारसंघातील तीन जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित मतदारसंघात लढती अटळ असल्याचे सद्यचित्र आहे. मंगळवारी अर्ज छाननीत अनुसुचित जाती जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघातील दोन उमेदवारांचे बाद झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दीही झाली होती. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीत दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राखीव जागेचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दाखला नसल्याने अरुण विष्णू पवार रा. कामथी, ता. सातारा यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
तर भटक्या जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग मतदारसंघातून शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील रा. लोणंद, ता. खंडाळा यांचा उमेदवारी अर्जही ते संस्था थकबाकीदार असल्याच्या कारणातून नामंजूर करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आता दि. 10 ऑक्टोपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून आता खऱया अर्थाने बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. मात्र, 10 तारखेनंतरच निवडणूक बिनविरोध होणार की रणसंग्राम होणार याचे चित्र स्पष्ट होईल.