दैनिक स्थैर्य । दि.९ मे २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून संपूर्ण राज्यासह देशामध्ये मिरवणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनी नुकतीच सर्व प्रकारच्या व्याजदरांमध्ये कपात जाहीर केलेली आहे. त्याचे मूळ कारण हे आम आदमी पार्टीच आहे. आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने संबंधित खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा बँकेला व्याज दरामध्ये कपात करण्यात भाग पाडले असा दावा आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा पदाधिकारी असिफ पठाण व धैर्यशील लोखंडे यांनी केला आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून मिरवणाऱ्या व सर्व 953 विकास सेवा सोसायटीचा 100% व्यवसाय सोसायटी सचिवांमार्फत मिळवणाऱ्या जिल्हा बँकेच्या सर्व प्रकारच्या व्याजदरावर प्रश्नचिन्ह उभे केले. विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना मालक असूनही कोणत्या बँकेकडून अर्थसहाय्य घेत शेतकरी विकास सेवा सोसायटीमार्फत वाटप करण्याचा अधिकार असताना, प्रत्यक्षात सोसायटी सचिव मात्र सातारा जिल्हा बँकेची सर्व प्रकारची महागडी कर्जे शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे लक्षात आल्यावर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदराचा तपशील यासंबंधी जिल्हा बँकेकडे विचासरण्यास सुरुवात केली होती, असे मत सुद्धा असिफ पठाण व धैर्यशील लोखंडे यांनी व्यक्त केले.
मागील 3 वर्षाच्या कोरोना महामारीच्या खडतर कालखंडात जगभरातील बँकांनी त्यांच्या कर्जदारांना अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देत, मोठया प्रमाणात दिलासा दिला आहे, अनेक उद्योग धंद्यांना व्याजात सवलती देत ते सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरातील बँका एक अंकी व्याजदरावर असताना, सोसायटी मधील कर्जे शेतकऱ्यांना आजही दोन अंकी व्याजदरात शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात, असेही असिफ पठाण व धैर्यशील लोखंडे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीमधून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जांचा तक्ता पण लावण्याची मागणी पूर्ण करत असल्याचे मान्य केले आहे. सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी जिल्ह्यातील शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या सर्व घटकांना या विषयांवर जनजागृती करण्याचे आवाहन केले असून, सदर पाठपुरावा व व्याजदर कपातीमुळे जिल्ह्यातील लाखों शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. व्याजदरांमध्ये कपात केलेले संपूर्ण यश हे आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी असिफ पठाण व धैर्यशील लोखंडे यांनी व्यक्त केले.