स्थैर्य, सातारा, दि. २८ : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. देशात व राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून करोना विषाणूचा प्राmदुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक मदतीसह विविध उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीमार्फत जिल्हा बँकेस ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी समितीचे विभाग प्रचारक केदार कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. यावेळी समितीचे जिल्हा कार्यवाहक मुकुंद आफळे, जिल्हा सदभाव संयोजक चंद्रकांत धुळप, बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बँक बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बँकेच्या संचालक यांचा सभा भत्ता व बँक अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन, अशी एकूण 16 लाख रुपये, 2019-20 च्या ढोबळ नफ्यातून 1 कोटीचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेशाद्वारे दिला. जिल्ह्यातील स्थलांतरित, मोलमजूर, शेतमजूर व गरजू कुटुंबांना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट उपलब्ध करून दिले.
बँक शाखांवर नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित तालुक्याचे विभागीय विकास अधिकारी व मुख्यालयामार्फत एक वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक केली आहे. शाखेतील दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी शाखा कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावास/वाडीस आठवड्यातील दिवस ठरवून दिले आहे. कामकाज सुरू असून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ग्राहकांना शाखेमध्ये येताना स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. शाखेमध्ये सामाजिक विलगीकरणासाठी एका वेळी आवश्यक तेवढ्याच ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. शाखेच्या वयोवृद्ध पेन्शनर व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेल्या ग्राहकांना बँक सेवकांमार्फत घरपोहोच पेन्शन रक्कम दिली जात आहे.
जिल्ह्यातील बँक कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझर व कॅशियर सेवकांना हँडग्लोजचे वाटप करण्यत आले आहे. ग्राहकांनी जास्तीत जास्त ऑनलाइन पद्धतीने एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस व डिजिटल बँकिंग व्यवहार करणे व शाखेमध्ये विनाकारण गर्दी करू नये याबाबतचे आवाहनवृत्तपत्र व नोटिसीद्वारे प्रसिद्ध केले आहे. बँकेने भारत सरकारचे ‘आरोग्य सेतू अॅप’चे महत्त्व पटवून देऊन ग्राहक व सेवकांना मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्याकरता आवाहन केले. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करून बँक दैनंदिन कामकाज करीत आहे.
सर्व शाखा व एटीएममध्ये पुरेशी कॅशची व्यवस्था व 47 एटीएम मार्फत ग्राहकांना 24 तास सेवा दिली जात आहे. बँकेच्या 320 शाखांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी केली. ज्या ठिकाणी बँकिंग सुविधा उपलब्ध नाही त्या वाडी-वस्तीवर गर्दी होणार्या गावात/बाजारतळावर मोबाईल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली बँकेने कोविड-19 ‘काळजी घ्या घाबरू नका’ ही मार्गदर्शनपर पुस्तिका गावोगावी ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम केले. पुस्तिकेमध्ये कोरोना आजाराबाबत घ्यावयाची काळजी, मास्क व सॅनिटायझरचा वापर कसा करावा व आजारासंबंधी अफवांची माहिती दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेत कोरोनाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे, स्वच्छता, विनाकारण बाहेर न पडण्यासाठी, बँक कर्मचार्यांसाठी आवश्यक ती काळजी घेण्याबाबत बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वृत्तपत्राद्वारे वारंवार आवाहन केले.