स्थैर्य, सातारा, दि. 10 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सरकारी दवाखान्यात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्यसेवक-सेविका दिवस-रात्र काम करत आहेत. या काळात समाजातील काही लोक त्यांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवक व सेविकांवर अन्याय करणार्यांवर कारवाई करावी व त्यांच्या सामाजिक हक्कांबाबत योग्य ते आदेश काढावेत, अशी मागणी करिश्मा लडकत यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवदेनाद्वारे केली आहे.
लडकत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी करिश्मा लडकत सातार्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दि. 1 सप्टेंबर 2020 ला लॅब टेक्निशियन म्हणून रुजू झाले आहे. सेवेत रुजू झाल्यापासून सोसायटीतल्या रहिवाशांनी माझ्या घरमालकाकडे तक्रार करायला सुरुवात केली होती. तशी कल्पना मी या ठिकाणच्या आशा सेविकांनाही दिली होती. तद्नंतर दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी माझ्या सासर्यांचे किरकोळ आजारात योग्य ते उपचार व डॉक्टर न मिळाल्यामुळे देहावसान झाले. तरीही दि. 8 सप्टेंबर 2020 रोजी मी कामावर हजर झाले. बुधवारी (दि. 9) माझे पती गावी एकट्या वृद्ध आईकडे गेल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी घरमालकांना बोलावून मला उद्याच्या उद्या घर सोडायला सांगितले आहे. तशा आशयाचे फोन कॉल्स सायंकाळी त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये केले होते.
तसेच आमच्या घरमालकांना धमकावून दोन दिवसांत त्यांना घराबाहेर काढण्यास सांगितले आहे. अगदीच साहित्य नेता येत नसेल तर मला घरी न येण्याबाबत सक्त ताकीत दिली आहे. त्यामुळे माझ्यावर अन्याय करणार्या संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, असेही शेवटी निवेदना नमूद करण्यात आले आहे.
लडकत यांनी या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, सातारा व पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस स्टेशन यांनाही दिल्या आहेत.