पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डुडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ जुलै २०२३ | सातारा |
यावर्षी आत्तापर्यंत जिल्ह्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पुढील वर्षीही कमी पर्जन्यमानाची शक्यता आहे. त्यामुळे पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’द्वारे योग्य नियोजन करावे, तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्यासारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर जिल्हा प्रशासन सज्ज असून स्थलांतरीत होणार्‍या बाधितांसाठी ४७ निवारा शेड, ५०० प्रशिक्षित आपदामित्र, वीज अटकाव यंत्रणा, १५ सॅटेलाईट फोन संच आदी साधनसामग्रीनिशी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, मान्सून कालावधीत सर्व संबंधित विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास कार्यान्वित आहे. या ठिकाणी ०२१६२ – २३२३४९/२३२१७५ या ठिकाणी नागरिक संपर्क साधू शकतात.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळूण-कराड महामार्ग, सज्जनगड ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग, शेंद्रे ते बामणोली मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वरील प्रमुख ६ मार्गांवर व इतर धोकादायक ठिकाणी घाटनिहाय नोडल ऑफीसर (शाखा अभियंता) यांची नियुक्ती केलेली आहे. या ठिकाणी आवश्यक ती यंत्रसामुग्री (जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर इ.) चे नियोजन केलेले आहे. तथापि, अतिवृष्टी होत असताना नागरिकांनी या रस्त्यावरील प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

जिल्ह्यात संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीच्या कालावधीत एनडीआरएफची १ तुकडी साहित्यासह कराड किंवा पाटणला तैनात ठेवण्यात येते. तसेच एनडीआरएफ (पुणे) मार्फत एप्रिलमध्ये शासकीय कर्मचारी, उत्कृष्ट पोहणारे, आपदा मित्र, युवक यांना प्रात्यक्षिक देण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्हयात एकूण ५०० आपदा मित्रांना यांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात वीज पडून दुर्घटना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यात एकूण आठ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

जिल्ह्यातील दरडीचा धोका असलेल्या ४१ गावांपैकी १९ गावांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत जीएसआयकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. याकामी शासनाकडून एकूण ३ कोटी ८८ लाख निधी प्राप्त झालेला आहे. तसेच भैरवगड, ता. सातारा गावातील एकूण ११८ कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन सासपडे, ता. सातारा येथील शासकीय जागेत करण्यात येणार आहे.

पर्यटनाच्या ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये. त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचा अथवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा, नदी अथवा नाल्याची पाणीपातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करू नये, अतिवृष्टीच्या कालावधीत तात्काळ सुरक्षित जागेत स्वत:हून स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

जिल्ह्यातील पर्जन्यमान
सातारा जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८८६.२ मि.मि. (जून ते सप्टेंबर)
आजअखेर पडलेला पाऊस (दि.१२/७/२०२३ अखेर) १५९.०० मि.मी.
आजअखेर टक्केवारी ५०.८ % वार्षिक टक्केवारी -१७.९ %
मागील वर्षी सन २०२२ मध्ये झालेला पाऊस – २८८.१ मि.मी.

  • धरणातील पाणीसाठा सद्य:स्थिती :
    कोयना – २३.२४ %
    धोम – २५.५८ %
    धोम-बलकवडी – ४२.६८%
    कण्हेर – २०.१३%
    उरमोडी – ३२.८५%
    तारळी – ५३.९४%
    सर्व धरणातील एकूण पाणीसाठा टक्केवारी २५.७०% (मागील वर्षी -३२.९२%)
  • पूरप्रवण गावे
    अ.क्र. तालुका           नदीकाठची/संभाव्य पूरप्रवण गावे               संभाव्य दरडप्रवण गावे
    १       सातारा                               ३३                                                     १०
    २       जावली                               ००                                                     १०
    ३       कोरेगाव                              ११                                                     ००
    ४        कराड                                 ५५                                                     ००
    ५        पाटण                                ३१                                                     ५०
    ६         वाई                                  १७                                                     १८
    ७        म.श्वर                               ००                                                     ३६
    ८        खंडाळा                              ०९                                                     ००
    ९        फलटण                             १६                                                     ००
    एकूण          १७२                                                   १२४

निवारा शेडची उभारणी
संभाव्य पूरपरिस्थिती व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य बाधित नागरिक व कुटुंब यांचे तात्पुरते स्थलांतर निवारा शेड येथे करण्यासाठी उपाययोजना म्हणून सन २०२१ मध्ये पाटण तालुक्यामध्ये कोयनानगर येथील जलसंपदा विभागातील-१५२ रूम व सन २०२० मध्ये पाटण तालुक्यातील जिमनवाडी-७, सावरवाडी-२, म्हारवंड-७, बोरगेवाडी-१, कळंबे-१, भैरेवाडी (डेरवण)-१, बाटेवाडी-१, केंजळवाडी-२, मसुगडेवाडी-४ व पाबळवाडी-१ येथे आणि जावली तालुक्यात घोटेघर-रांजणी-३, धनगरपेढा (मोरघर)-२, नरफदेव (मेरुलिंग)-२ येथे तसेच सातारा तालुक्यातील मोरेवाडी-२ व टोळेवाडी (मांडवे)-१२ निवारा शेड असे एकूण ४७ निवारा शेड बांधण्यात आलेले आहेत.

नियंत्रण कक्ष
मान्सून कालावधीत सर्व संबंधित विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ बाय ७ या तत्वावर कार्यान्वित आहे. फोन नं -०२१६२-२३२३४९/२३२१७५. तसेच जिल्हयातील पोलीस विभाग- फोन नं.०२१६२-२३३८३३/२३११८१ मो.नं.-९०१११८१८८८, पाटबंधारे विभाग फोन नं -०२१६२-२४४६८१/२४४६५४/२४४४८१, सार्वजनिक बांधकाम विभाग फोन नं-०२१६२-२३४९८९, आरोग्य विभाग फोन नं- ०२१६२-२३३०२५/२३८४९४, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मो.नं-९०२९१६८५५४ इत्यादी विभागांनी त्यांचे स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केलेले आहेत.

पर्जन्यमान, विसर्ग इ.च्या माहितीसाठी वेबसाईट
मान्सून कालावधीत धरण क्षेत्रात होणारे पर्जन्यमान, धरणातील साठा आणि पाण्याचा विसर्ग तसेच नदीपातळी इ. अद्ययावत माहिती ऑनलाईन प्राप्त करून घेणेसाठी शासनाचे वेबसाईट
1. www.Punefloodcontrol.com 2. http://210.212.172.117/Artdas

दरडप्रवण भागातील बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन
सातारा जिल्हयात माहे जुलै २०२१ या कालावधीमध्ये अतिवृष्टी होऊन पश्चिमेकडील तालुके पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या भागात बर्‍याच ठिकाणी दरडी कोसळून गावांना धोका निर्माण झाला होता. सदर गोष्टीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट २०२१ मध्ये पाहिल्या टप्प्यात ४१ गावांचे जिओलॉजिकल सर्व्हे ऑ इंडिया, पुणे संस्थेकडून विस्तृतपणे सर्व्हे पूर्ण करून घेतला. जीएसआय पुणे यांच्या अहवालानुसार ४१ गावांपैकी पाटण तालुक्यातील (८) – आंबेघर खालचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), अंबेघर वरचे, काहीर, महाबळेश्वर तालुक्यातील (७)- दरे, दुधोशी, येर्णे बु, येर्णे खु, घावरी, चतुरबेट, एरंडेल, वाई तालुक्यातील (०२)- कोंढावळे, जोर आणि सातारा तालुक्यातील (०१) – भैरवगड असे एकूण १९ गावांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत जीएसआय पुणे यांचेकडून अहवाल प्राप्त झाला होता. त्यानुसार, पाटण तालुक्यातील-०८ गावे (शिद्रुकवाडी, काहीर, आंबेघर (खालचे), आंबेघर (वरचे), ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी-हुंबरळी) आणि सातारा तालुक्यातील मौजे भैरवगड या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणेकामी शासनस्तरावरून मान्यता मिळालेली आहे.
पाटण तालुक्यातील प्रस्तावित ८ गावांची एकूण ५५८ कुटुंबासाठी एकूण ९ हे. ४८ आर क्षेत्र पुनर्वसानाकामी आवश्यक त्या वाटाघाटी करून जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी पाटण यांचेमार्फत शीघ्रगतीने चालू आहे. याकामी शासनाकडून एकूण र.रु. ३ कोटी ८८ लाख इतका निधी प्राप्त झालेला आहे.

तसेच भैरवगड, ता.जि.सातारा या गावातील एकूण ११८ कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन मौजे सासपडे, ता.जि.सातारा येथील शासकीय जागेत करण्यात येणार असल्याने याबाबतची कार्यवाही उपविभागीय अधिकारी सातारा यांचेमार्फत चालू आहे.

याकामी सदर गावांचे पुनर्वसनाचे सर्वकष नियोजन करण्यासाठी नियोजन प्राधिकारी म्हणून शासनामार्फत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर पुनर्वसनाचे कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात आवश्यक त्या विभागाच्या परवानग्या व मंजूरी घेऊन मान्सून कालावधी संपल्यानंतर होईल व पुनर्वसित होणार्‍या सर्व गावांना आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. उर्वरित वाई, जावली आणि महाबळेश्वर या तालुक्यातील कायमस्वरुपी पुनर्वसन करणेकामी शिफारस केलेल्या गावांचे पुनवर्सनाची कार्यवाही शासनस्तरावरुन मंजुरी प्राप्त होताच तातडीने करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!