राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२३ । मुंबई । महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन 2021-22 साठीचे वितरण मंगळवार, दि. 11 जुलै 2023 रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून लोकसभा सदस्य राहुल शेवाळे आणि विधानसभा सदस्य सदा सरवणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्त 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संस्कृत नाट्य स्पर्धेतील, 18 व्या बालनाट्य स्पर्धेतील आणि तृतीय दिव्यांग नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सवही होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

बुधवार, दि. 12 जुलै रोजी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रशांत चव्हाण लिखित आणि भरत मोरे दिग्दर्शित ‘वाचवाल का’? हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. 13 जुलै रोजी डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित ‘इन द सेल ऑफ सर्व्हायवल’ हे मराठी नाटक आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी ‘मोक्षदाह’ हे नाटक सादर केले जाणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर येथेच सायंकाळी 7 वाजता या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!