दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्यावतीने निराधार विधवा महिलांना भाऊबीजेच्या सणानिमित्त साडीचोळी व फराळाचे वाटप करून एक अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कामधेनू सेवा परिवार, इंदापूरचे डॉ. लक्ष्मणराव आसबे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. आसबे म्हणाले, संवेदना जिवंत माणसाचे लक्षण असून ताई म्हणणे सोपे असून भाऊ बनणे अवघड आहे. भाऊ बनण्यासाठी वासना जाळावी लागते. संकल्प सत्य असेल तर आपणास काहीही कमी पडत नाही. सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेला हा भाऊबीजचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचेही डॉ. आसबे यांनी याप्रसंगी सांगितले.
दिलीपसिंह भोसले म्हणाले, पतीच्या निधनानंतर समाजातील काही महिलांना कोणाचाही आधार नसतो. स्वतः कष्ट करून त्या स्वत:ची व आपल्या मुलांची उपजीविका करीत असतात. अशा महिलांना गरज असते ते खंबीर भावाची. डॉ. लक्ष्मण असबे यांच्या कार्याच्या प्रेरणेतून आपण ही अशा निराधार विधवा महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले पाहिजे, याची जाणीव मनामध्ये निर्माण झाली आणि अशा महिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’. आपल्या भारत देशात आदर्श संस्कृतीचे जतन केले जाते. त्यातीलच भाऊबीज हा एक सण जाती-धर्माची भिंत ओलांडून अशा निराधार महिलांना भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांना साडी-चोळी वाटप करीत आहोत. या सामाजिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी आपण निराधार विधवा महिलांना या उपक्रमात समाविष्ट केले असून पुढील वर्षीपासून यापेक्षा अधिक निराधार विधवा महिलांना आधार देण्याचं काम या संस्थेमार्फत केले जाईल. यानिमित्ताने स्वयंसिध्दा समूहाच्या अध्यक्षा अॅड. सौ. मधुबाला भोसले यांच्यावतीने या महिलांसाठी फराळाचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवम प्रतिष्ठान फलटण विभागाचे प्रमुख चंद्रकांत गायकवाड, सद्गुरु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भाई गांधी, राजाराम फणसे आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.