दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । ठाणे । स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमवगळून), अन्न व नागरी पुरवठा, ग्राहकसंरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते महाप्रितच्या वतीने महादिवा उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय सुधारित निर्धुर चुलीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादीत (महाप्रित) या निमशासकीय कंपनीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा महाप्रितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, अतिरिक्त पोलीसआयुक्त दत्ता कराळे, महाप्रितचे संचालक वि.ना. काळम पाटील, महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की, महाप्रिततर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेले असून ते समाजउपयोगी आहेत. सुधारीत निर्धुर चुलींच्या वितरणामुळे पर्यावरणाचा जो आज विविध घटकांमुळे ऱ्हास सुरु आहे, तो टाळण्यास मदत होणार आहे. इंधन बचत होणार असून महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यास सहाय्य होणार आहे. महाप्रितने हा कार्यक्रम गतिमान पध्दतीने राबवावा. पात्र लाभार्थींनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. श्रीमाळी यांनी या सुधारीत निर्धुर चुली वितरणाचा उद्देश स्पष्ट केला. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आज ठाणे येथून करण्यात येत असून, या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्यात 4 लाख निर्धुर चुलींचे वितरण मागासवर्गीय लाभार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सुधारीत निर्धुर चुली एनकिंग इंटरनॅशनल यांच्याकडून “कार्बन क्रेडीट अंतर्गत” मोफत देण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना धुरामुळे होणारा त्रास या चुलींमुळे कमी होणार असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असून इंधन बचत होणार असून पर्यावरणाचा ऱ्हासही थांबण्यास मदत होणार आहे. जागतिक स्तरावरती अशा प्रकारचा कार्यक्रम सुरु असून भारताने देखील त्यामध्ये सहभाग नोंदविलेला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना सुधारीत निर्धुर चुलींचे वितरण मंत्री श्री. चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
निर्धुर चुल वितरणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपवर मागासवर्ग समाजातील लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाप्रितचे श्री. काळम पाटील यांनी केले.