दैनिक स्थैर्य । दि. 18 फेब्रुवारी 2022 । सातारा । अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणार्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे रविवार, दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 6 वाजता. पाठक हॉल, नगर वाचनालय, राजवाडा सातारा. येथे होणार असल्याची माहीती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक, सातारा नगरपरिषदेचे माजी सभापती रविंद्र भारती-झुटिंग यांनी दिली. पुरस्काराचे हे सहावे वर्षे आहे.
आजच्या व्हॉटस्अॅप आणि फेसबुकच्या काळात युवक वाचनापासून दूर जात आहेत. अशा काळात वाचन संस्कृती टिकवण्याचे काम खर्याअर्थाने ग्रंथालये व वाचनालये करीत असतात. दरवर्षी अनेक लेखक विविध विषयांवर पुस्तके लिहीत असतात, प्रकाशित करीत असतात. अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोचवण्याचे कामही ग्रंथालये करीत असतात. या ग्रंथालयांना, या वाचन संस्कृती टिकवणार्या चळवळीमध्ये परिश्रम करणार्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने साहित्य क्षेत्रासाठी भरीव असे कार्य करणार्या श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे नावे दरवर्षी ग्रंथालय गौरव पुरस्कार, ग्रंथालय कार्यकर्ता गौरव पुरस्कार, ग्रंथालय कर्मचारी गौरव पुरस्कार, ग्रंथ वाचक गौरव पुरस्कार तसेच ग्रंथगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते. या वर्षीचा ग्रंथ गौरव पुरस्कार जीवन इंगळे, बुध यांना, ग्रंथालय गौरव पुरस्कार सरस्वती सार्वजनिक वाचनालय, वाठार (कि.) ता. कोरेगाव यांना, ग्रंथालय कार्यकर्ता गौरव पुरस्कार सुनिता कदम, सातारा यांना, ग्रंथालय कर्मचारी गौरव पुरस्कार सुनिल पवार, फलटण यांना तर ग्रंथ वाचक गौरव पुरस्कार सुरेश गायकवाड, सातारा यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांचे हस्ते देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे अवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष शशीभूषण जाधव, कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.