दैनिक स्थैर्य | दि. १ जानेवारी २०२५ | सातारा |
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वा. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात आयोजित केला आहे.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. दिलावरसाहेब मुल्ला, मुल्ला कुटुंबीय, संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.