
स्थैर्य, 7 जानेवारी, सातारा : पॉकेट बुक ते ई-बुक’ असा प्रवास करणाऱ्या मराठी साहित्याच्या वाटचालीस अनुसरून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मरणिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहे. ‘अटकेपार’ नावाच्या यां स्मरणिकेच्या डिजिटल आवृतीचा वितरण शुभारंभ गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता करण्यात येणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सुरुची बंगला येथे होणाऱ्या या कार्यक्रमात संमेलनाच्या स्मरणिकेची लिंक शेअर केली जाणार आहे. त्यामुळे ‘अटकेपार’ स्मरणिका संगणक, लॅपटॉप, मोबाइल आणि अन्य डिव्हाइसवर सेव्ह करता येईल आणि सवडीप्रमाणे वाचता येईल. कागद आणि शाईच्या बचतीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार असून, बुक-शेल्फमधील जागा वाचवून वाचकांना हा महत्त्वपूर्ण दस्तावेज संग्रही ठेवता येणार आहे.
याविषयी आणखी माहिती देताना संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, मराठी साहित्यविश्वाने तंत्रज्ञानातील बदल नेहमीच जलदगतीने आत्मसात केले आहेत. ई-बुकच्या स्वरूपात वाचक आज स्क्रीनवर वाचनाचा आनंद घेत आहेत. याखेरीज, कसदार मराठी साहित्य ऑडिओ बुक्समध्येही उपलब्ध झाले असून, संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनात ई-बुक्स, ऑडिओ बुक्सचेही स्टॉल यावर्षी उभारण्यात आले होते. रसिकांचा मोठा प्रतिसाद या स्टॉल्सना लाभला. वाचनाची ही नवसंस्कृती झपाट्याने विकसित होत असल्यामुळे स्मरणिकेची डिजिटल आवृत्ती तयार करण्याची संकल्पना पुढे आली.
शतकपूर्व संमेलन ऐतिहासिक राजधानीच्या शहरात झाल्यामुळे साहित्यनगरीला स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले. स्वराज्यविस्ताराच्या अभिमानास्पद कार्याला मानवंदना म्हणून स्मरणिकेलाही ‘अटकेपार’ असे नाव देण्यात आले. वाचनीय मजकूर असलेली ही परिपूर्ण स्मरणिका आता डिजिटल स्वरुपात वाचक आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतील आणि प्रवासातही वाचू शकतील. या डिजिटल आवृतीच्या वितरण शुभारंभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

