दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । कठीण परिस्थितींचा सामना करून समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने डॉ. बत्रा’जद्वारे पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात मृदूल घोष, झैनिका जगासिया, डॉ. जितेंद्र अग्रवाल, डॉ. फातिमा आसला, अमीर सिद्दिकी यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन टाटा थिएटर, एनसीपीए, मुंबई येथे बजाज ऑटोच्या सहयोगाने करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याचे हे चौदावे वर्ष होते.
देशभरातील शेकडो अर्जांमधून विजेत्यांची निवड करण्याची मोठी जबाबदारी मान्यवर परीक्षक मंडळाने पार पाडली. त्यात राजीव बजाज- व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो, डॉ. मुकेश बत्रा, पद्मश्री आणि डॉ.बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, श्री. मनेका संजय गांधी, विवेक ओबेरॉय आणि डॉ. आर. बाल्की यांचा समावेश होता.
डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले की, “पॉझिटिव्ह हेल्थ हिरोज आपल्याला सक्षम शरीर असलेल्यांना आयुष्यात आणखी कामगिरी करून समाजात योगदान देण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे आणि एक काळजी घेणारा ब्रँड म्हणून आम्हाला त्यांच्या अदभुत कथा जगासमोर आणताना खूप गौरव वाटतो आहे. आमच्या आधीच्या विजेत्यांनी उत्तमोत्तम कामगिरी करून भारतात इतरही अनेक गौरव मिळवले आणि आम्हाला आशा आहे की, त्यांची मेहनत आणि दृढनिश्चय त्यांना नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी मदत करेल. आम्ही श्री. राजीव बजाज यांचे या खऱ्या आयुष्यातील हिरोंची ओळख पटवण्याच्या आमच्या प्रयत्नात त्यांच्या सहाय्यासाठी आभारी आहोत.”
या पुरस्कार सोहळ्यात आघाडीचे उद्योजक, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचा सामील झाले होते. अंध व्यक्तींच्या ऑर्केस्ट्राने गायलेल्या स्वरांगी या गाण्याने आणि मिरॅकल ऑन व्हील्स या डान्स ग्रुपने व्हीलचेअरवर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमात अनेक मान्यवर सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती दर्शवली यात सिमी गरेवाल, मधु शाह, भरत दाबोलकर, सिद्धार्थ काक, गौरव शर्मा, रूपाली सुरी, सोनल जिंदाल, ग्वेन अथाईड, सिमरन आहुजा, सोमा घोष, मिकी मेहता आणि दिलीप पिरामल एसडी सहभागी झाले होते.
२०२२ या वर्षाचे पॉझिटिव्ह हेल्थ पुरस्कार विजेते आपल्या समाजाला दिशा देणारे आहेतः
मृदूल घोषः मृदूल हे भारतीय हवाईदलाचे कर्मचारी असून त्यांच्या एका अपघातामुळे मणक्यातील सी५ आणि सी६ दुखापतींमुळे त्यांना संपूर्ण पॅरलिसिस झाला आहे. परंतु त्यांनी आपल्या या स्थितीला आपला अडथळा बनू दिले नाही. पुढे जात राहण्यासाठी वचनबद्ध असलेल्या मृदूल यांनी आपल्या ओठांचा वापर करून रंगवायला सुरूवात केली. त्यानंतर ते माऊथ अँड फूट पेंटिंग आर्टिस्ट्स (एमएफपीए)चा भाग झाले. ते आता दिव्यांग पीआरसी ट्रूप्सना प्रशिक्षण देतात आणि त्यांना त्यासाठी ‘२०२० आर्टिस्ट ऑफ दि इयर’ आणि ‘एमएफपीए इंडिया एक्सलन्स अवॉर्डससह’ अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
झैनिका जगासिया: पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्डसची दुसरी पुरस्कार विजेती झैनिका ही डाऊन सिंड्रोमने ग्रस्त मुंबईस्थित मॉडेल आहे. तिने सौंदर्याच्या समाजातील व्याख्या बदलल्या आणि आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व केले. मॉडेलिंगची आवड असल्यामुळे तिने अनेक ब्रँड्ससोबत मोठमोठ्या संधी मिळवल्या आहेत. गजरा गँग, कॉटन वर्ल्ड आणि न्याका यांच्यासारख्या ब्रँड्सनी तिला संधी दिली. मारिका मॅगझीनमध्येही तिच्यावर लेख लिहिण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातही तिने उत्तम कामगिरी केलेली आहे.
डॉ. जितेंद्र अग्रवाल: मॅक्युलर डिजनरेशनमुळे आपली नजर गमावलेल्या डॉ. जितेंद्र अग्रवाल यांना डेंटल सर्जन म्हणून आपली सहा वर्षांची प्रॅक्टिस बंद करावी लागली. बरे होण्याच्या कालावधीत त्यांना ही गोष्ट लक्षात आली की अपंगत्व असलेल्या व्यक्तीला (पीडब्ल्यूडी) फक्त अपंगत्वाचाच त्रास होत नाही तर आपण कोणावरतरी अवलंबून आहोत ही भावना जास्त वेदनादायी ठरते. त्यामुळे या गोष्टीवर उपाय काढण्यासाठी त्यांनी ‘सार्थक’ची स्थापना केली.
सार्थकने आपल्या प्रारंभीच्या हस्तक्षेप आणि सर्वसमावेशक शैक्षणिक उपक्रमाद्वारे ३१४ अपंग मुलांचे पुनर्वसन केले आहे. त्यांनी ४५५० पीडब्ल्यूडी उमेदवारांना प्रशिक्षण दिले, १०० पेक्षा अधिक रोजगार मेळावे घेतले आणि ७२५० पीडब्ल्यूडींना रोजगार मिळवून दिला.
डॉ. फातिमा आसला: ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा म्हणजेच ब्रिटल बोन डिसीजने ग्रस्त असलेल्या डॉ. फातिमा यांच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ डॉक्टर आणि रूग्णालयांमध्ये भेट देण्यात घालवला. तेथे आपल्या रूग्णांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते हे पाहून त्या थक्क झाल्या. आपल्यासारख्या व्यक्तींना मदत करण्यासाठी त्यांनी वैद्यकशास्त्र शिकायचे ठरवले. त्यांनी आपले बीएचएमएस एनएसएस होमिओ मेडिकल कॉलेज, कोट्टायम येथून पूर्ण केले आणि एएनएसएस होमिओ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हाऊस सर्जन म्हणून काम केले.
अमीर सिद्दिकी: अमीर सिद्दिकीहे उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांना १८ महिन्यांच्या वयात पोलिओ झाला होता. अमीर यांचे बालपण खूप कठीण होते. त्यांना भेदभाव आणि शाळेतल्या मुलांकडून चिडवणे हे प्रकार झेलावे लागलेच पण नातेवाईकांकडूनही झेलावे लागले. परंतु त्यांनी हार मानायची नाही असे ठरवले. त्यांनी आपले शिक्षण आणि शक्तीद्वारे अपंगत्व असलेल्या लोकांबद्दलच्या लोकांच्या मतांना आव्हान दिले. आज त्यांच्याकडे ३ मास्टर्स पदव्या आहेत आणि ते सध्या पी.एचडी. करत आहेत. ईगल स्पेशली एबल्ड रायडर ही त्यांची स्वयंसेवी संस्था असून त्यात ५०० पेक्षा अधिक पॅरा रायडर्स आहेत. ते निरक्षरता, बलात्कारमुक्त भारत अशा सामाजिक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतभरात रॅली काढतात.