दैनिक स्थैर्य | दि. 18 जुलै 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहर आणि तालुक्यामधील सर्वसामान्य १५०० विद्यार्थिनींना आपल्या शाळेमध्ये व कॉलेजला जाण्यासाठी मोफत सायकलचे वाटप करण्यात आले आहे.
फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात सायकल वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण शहरासह तालुक्यामधील ज्या विद्यार्थिनी शाळेपासून व कॉलेज पासून लांब पल्यावर राहत आहेत. अशा सर्व विद्यार्थीनींना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मोफत सायकलचे वाटप करण्यात आले आहे. सायकल वाटपाचा हा प्रथम टप्पा असून असे अजून १० टप्पे म्हणजेच सुमारे १५ हजार सायकली फलटण शहर तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघांमधील माण व इतर तालुक्यामध्ये सुद्धा मोफत सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसामध्येच माण तालुक्यांमध्ये मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रमाचे सुद्धा लवकरच आयोजन करण्यात आले असल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले.