सिंचन प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,धुळे, दि. 9: धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जलसंपदामंत्री श्री. पाटील आजपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज दुपारी उत्तर महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन समिती सभागृहात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, माजी मंत्री एकनाथराव खडसे आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, धुळे जिल्ह्यात सुलवाडे – जामफळ- कनोली सारख्या महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. या योजनेतून 52 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी. या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनासाठी प्रस्ताव सादर करावेत. लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी दिले. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. कार्यकारी संचालक श्री. स्वामी यांनी धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची माहिती दिली. अधीक्षक अभियंता श्री. आमले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!