स्थैर्य, भंडारा, दि.06: वैनगंगेच्या पूराचे पाणी घरात शिरलेल्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान वाटप करा तसेच ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आशा कुटुंबाला तातडीने मोफत धान्य वाटप करा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले. घराचा व शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे तातडीने करून शासनाला अहवाल सादर करा असेही ते म्हणाले.
राज्याचे जलसंपदा व लाभश्रेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, ईतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली.
भंडारा तालुक्यातील पिंपरी, सालेबरडी, पिंडकेपार, गणेशपूर व कारधा येथील पूर परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, नायब तहसीलदार राजेंद्र निंबार्ते व गोसेखुर्दचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुरामुळे नुकसान झालेल्या संपूर्ण गावाचा व शेतीचा सर्व्हे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी या दौऱ्यात दिले. पुरामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान तातडीने देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य खराब झाले अशा कुटुंबातील सदस्यांना मोफत धान्य वितरण तात्काळ करावे असे ते म्हणाले. ज्यांच्या घराचे पूर्णतः व अंशतः नुकसान झाले अशा नागरीकांना देखिल सानुग्रह अनुदान तातडीने वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पिपरी येथील नागरिकांना पट्टे वाटपाबाबत बोलतांना श्री. कडू म्हणाले की, चौकशी करून पट्टे वाटपाचा विषय तात्काळ निकाली काढावा.
त्यानंतर पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील गावातील पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी नागरिकांशी चर्चा करून शासन आपल्या पाठीशी आहे, प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबास मदत दिली जाईल कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली.
नुकसानीचे पंचनामे गतीने करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.