स्थैर्य, मुंबई, दि.६ : ‘दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप लावताना अभिनेत्री पायल घोषने काही कारण नसताना माझे नाव घेऊन या वादात ओढले आहे. शिवाय बिनबुडाचे व अश्लील आरोप करून माझी बदनामी केली आहे’, असे म्हणत अभिनेत्री रिचा चढ्ढाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याविषयी सोमवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर न्या. ए. के. मेनन यांनी पायलला पुन्हा एकदा नोटीस देण्याचे निर्देश रिचाच्या वकिलांना देऊन पुढील सुनावणी उद्या, बुधवारी ठेवली आहे.
‘अनुरागने २०१४मध्ये मला त्याच्या घरी बोलावून माझा विनयभंग केला आणि माझ्यासमोर अश्लील वर्तन केले’, असा आरोप पायलने जाहीररीत्या केल्यानंतर त्याविषयी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात एका व्हिडिओद्वारे आरोप करताना पायलने रिचाचाही उल्लेख केला.
त्यामुळे रिचाने अॅड. सवीना बेदी यांच्यामार्फत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून त्यात पायल आणि पायलचा व्हिडिओ प्रसारित करणारे एबीएन तेलुगू ही युट्युब वाहिनी तसेच अभिनेता कमाल आर. खान यांना प्रतिवादी केले आहे. या सर्व संबंधितांना आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यास आणि तो प्रसारित करण्यापासून तातडीने मज्जाव करावा, अशी विनंतीही रिचाने दाव्यासोबतच्या तातडीच्या अर्जात केली आहे.
‘या दाव्याविषयीची नोटीस देण्यासाठी आमचा माणूस पायलच्या निवासस्थानी गेला असता तिच्याकडून ती स्वीकारण्यात आली नाही. तिचा ईमेल आयडी आमच्याकडे नाही. तिचा मोबाइल नंबर असल्याने त्यावर व्हॉटसअॅपद्वारेही आम्ही नोटीस पाठवली. तरीही आजच्या सुनावणीला तिच्या वतीने कोणीही बाजू मांडण्यास हजर राहिले नाही’, असे सोमवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत रिचातर्फे ज्येष्ठ वकील अॅड. वीरेंद्र तुळजापूरकर यांनी यांनी सांगितले. तेव्हा ‘पुन्हा एकदा नोटीस देण्याचा प्रयत्न करा, ईमेलवरही पाठवण्याचा प्रयत्न करा’, असे निर्देश रिचाच्या वकिलांना देऊन न्यायमूर्तींनी याविषयीची तातडीची सुनावणी उद्या, बुधवारी ठेवली.