दैनिक स्थैर्य | दि. १६ जून २०२३ | फलटण |
फलटण शहरातील नागरी वस्तीतील डॉ. लावंड शेजारील जुन्या सिमेंट रस्त्यावरील सरकारी शौचालयाची दूरवस्था झाली असून नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या शौचालयाची लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये फलटण नगरपरिषद लाखो रुपये खर्च करून ही मोहीम राबवत असल्याचे दिसत आहे; परंतु नगरपरिषदेच्या हद्दीतील व नागरी वस्तीतील डॉ. लावंड शेजारील व जुन्या सिमेंट रोडवरील सरकारी शौचालयाची दूरवस्था झाली आहे. सदर ठिकाणी शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत. शौचालयाची भांडी खराब झाली आहेत. सरकारी शौचालयाच्या ठिकाणी पाण्याचा हौद नसल्यामुळे पाण्याचा वापर कमी होत आहे. त्यामुळे महिला व नागरिकांची कुचंबना होत असून सरकारी शौचालय नागरिक वापर करू शकत नाहीत. या शौचालयामुळे परिसरातील नागरिकांसह येणार्या-जाणार्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुन्या सिमेंट रोडवरील शौचालयाच्या दुरूस्तीबाबत गेल्या पाच वर्षांपूर्वी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन फलटण नगरपालिका दिले होते; परंतु यासंदर्भात फलटण नगरपालिका टाळाटाळ करत आहे. कुठल्याही प्रकारची दुरूस्ती व स्वच्छता येथे नसल्याचे दिसत आहे. म्हणून येणार्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र आप्पा सरगर यांनी दिला आहे.
यासंदर्भात नागरिकांनी वारंवार फलटण नगरपालिकेला तक्रार करून देखील जाणून-बुजून फलटण नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. पुढील आठवड्यात येणार्या संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त होणार्या गर्दीमुळे होणारा शौचालयाचा वापर यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या शौचालयाची दुरूस्ती व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.