नाराज काँग्रेस उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 14 : राज्यातल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी चर्चा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिल्यामुळे सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसला सरकारमध्ये मिळत असलेले दुय्यम स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांचे वाटप यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, काल रात्री काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट त्यांच्या खात्यातील काही विषयासंदर्भात होती. काँग्रेसच्या विषयाबाबत सुनील केदार मुख्यमंत्र्यांना भेटले नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली. सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने, विधानपरिषदेत एक जागा कमी मिळाल्यामुळे आणि आता निर्णय घेताना स्थान मिळत नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!