राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । पुणे । भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छ व हरित ग्राम’ व ‘जलसमृद्ध गाव’ या शाश्वत समान विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाच्यादृष्टीने विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.

यावेळी जलशक्ती मंत्रालयाच्या पाणी पुरवठा विभागाच्या सचिव विनी महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

सचिव श्रीमती महाजन म्हणाल्या, गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी स्वच्छता पंधरवड्यामध्ये आपल्या गावातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन विल्हेवाट लावावी. विकास कामे करतांना सामाजिक स्वयंसेवी संस्था, तांत्रिक सल्लागारांची मदत घ्यावी. ग्रामीण भागातील शौचालयाचा वापर, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, विविध शासकीय योजना याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

सहसचिव श्री. महाजन म्हणाले, स्वच्छ व हरित ग्राम व जलसमृद्ध गाव या शाश्वत समान विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत ५० हजार नागरिकांचा सहभाग घेतला आहे. येत्या २ ऑक्टोबर स्वच्छता दिनी श्रमदानाच्या माध्यमातून ५०० गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. माहिती, शिक्षण आणि संवाद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी गावपातळीवर संवाद साधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहे, असेही श्री. महाजन म्हणाले.

आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, स्वच्छ, हरीत व पाणीदार गावे तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये केवळ पाच वर्षाचा विचार न करता दिर्घकालीन नियोजनाची गरज आहे. पाण्याच्या गुणवत्तेबरोबरच मातीच्या आरोग्याची दक्षता घेण्याची गरज आहे. यासाठी पुढच्या २५ वर्षाचे नियोजन आज हाती घ्यावे लागेल.हिवरेबाजारसारख्या प्रयोगातून आपण गावाकडील स्थलांतर थांबवू शकलो तर शहरे सुरक्षित ठेवता येतील.

यावेळी कार्यशाळेत उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, कृषी अधिकारी आदींनी चर्चेत सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधला. कार्यशाळेत देशातील विविध गावातील यशकथा चित्रफीतीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!