
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त, शेती उत्पन्न बाजार समिती , कराड , कृषि विभाग , महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद सातारा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषि , औद्योगिक व पशू पक्षी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलला भेट देऊन सातारा जिल्हयातील गाय वर्गातील लम्पी चर्म रोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत माहिती घेवून चर्चा केली.
पशुसंवर्धन विभागाने सातारा जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचे केलेले प्रतिबंधात्मक लसीकरण, बाधित जनावरांवर करण्यात येत असलेले औषधोपचार, लम्पी चर्म रोगाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या पशुधनाच्या पशुपालकास वेळीच देण्यात आलेली नुकसान भरपाई व एकंदरीतच लंपी चर्म रोग नियंत्रण व उपचारसाठी पशुसंवर्धन विभागातील आधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, क्रांतीसिन्ह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय , शिरवळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले , जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.