दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गेल्या काही वर्षांपासून राज्यामध्ये जिल्हा निर्मितीची चर्चा वारंवार सुरू असते. राज्यामध्ये जास्त क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून नव्याने जिल्हा निर्मिती करण्याची लोक मागणी कायमच होत असते. आता नुकतेच राजस्थानमध्ये नव्याने १९ जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्यामध्ये नव्याने प्रस्तावित असलेल्या जिल्हा निर्मितीची सविस्तर माहिती सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पुन्हा तालुका फलटण, जिल्हा बारामती होणार का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
फलटणच्या पूर्व बाजूच्या एका टोकाला आसू गावामधून सातारा येथे जिल्ह्यातील कोणत्याही मुख्यालयात जर जायचे म्हणाले तर सुमारे ९० किलोमीटरचे अंतर आहे. त्यासोबतच अगदी फलटण शहरामधून जर सातारा येथे कोणत्याही कामासाठी जायचे म्हणाले तर सुमारे ७० किलोमीटरचे अंतर आहे आणि तेच जर बारामतीचे उदाहरण घेतले, अगदी फलटण शहरामधून अर्ध्या तासात म्हणजेच फक्त २८ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने फलटण तालुका हा बारामती जिल्ह्यामध्ये जाणेच सोयीचे ठरणार आहे.
फलटण तालुक्यातील नीरा नदीकाठचा भाग म्हणजे अगदी पाडेगावपासून ते आसूपर्यंतच्या सर्व गावांचा हा दैनंदिन जीवनामध्ये बारामतीशीच संबंध जास्त प्रमाणावर येतो; परंतु शासकीय कामांसाठी या सर्वांना सातार्याला खेटे मारावे लागत असतात. त्यामुळे जिल्हा विभाजन होऊन बारामती जिल्ह्यामध्येच फलटण तालुक्याचा समावेश होणे आवश्यक आहे.