नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीत घोळ; अनेक मतदार दुसऱ्या प्रभागात, पडताळणीची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांचे प्रभाग बदलले असल्याचे समोर आले आहे. अनेक मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे निदर्शनास आल्याने, यादीत मोठा घोळ झाल्याची चर्चा सुरू झाली असून, मुख्याधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून यादीची पडताळणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नगरपरिषद निवडणुकीसाठी दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही यादी तपासल्यानंतर अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट झाल्याचे दिसून आले आहे. या बदलांमुळे नागरिकांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून संपूर्ण मतदार यादीची बारकाईने पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी नगरसेवकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनीही आपापल्या प्रभागातील याद्या काळजीपूर्वक तपासून, काही चुका आढळल्यास विहित नमुन्यात आणि मुदतीत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन केले जात आहे. हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ ऑक्टोबर आहे.


Back to top button
Don`t copy text!