प्रवचने – ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥

माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥

आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते । आपले दुःखीपणाने ते दुःखी होते ।

आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते ।

म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥

शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥

नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥

आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥

प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥

आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥

निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥

अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥

ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥

प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥

परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥

शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥

मी कोण हे जाणले ज्याने चित्ती । त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥

राम त्राता हा भाव ठेवावा चित्ति । निर्भयता होईल याच रीती ॥

ज्याने देह केला रामाला अर्पण । त्याला नाही काळजीचे कारण ॥

कर्ता राम हे आणता चित्ति । पापपुण्याची नाही त्याला भीति ॥

ज्याचा परमात्मा झाला सखा । त्याला नाही कोठे धोका ॥

‘कर्ता मी’ म्हणे आपण । हे सर्व दुःख काळजीचे कारण ॥

झाले ते होऊन गेले । होणार ते चुकेना कोणाला भले ॥

म्हणून नाही करू काळजीला । राम साक्षी आहे त्याला ॥

जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥

राम त्यास सांभाळता । काळजीस कारण न उरले आता ॥

मुलाबाळांची न करावी काळजी । रामराय करावा राजी ॥

आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती । काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥

शक्यतो करावे नामस्मरण । आपली काळजी न करावी आपण ॥

रामाचा म्हणून प्रपंच केला । काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥

भगवंत असता पाठीराखा । काळजीची काय कथा ? ॥

म्हणून, मुखाने नाम, चित्तांत राम । त्याचे मनाला होईल आराम ॥

सतत ठेवावे एक चित्तीं । न सोडावा रघुपति ॥

सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥

नेमात नेम उत्तम जाण । रामावाचून न राहावे आपण ॥

सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥


Back to top button
Don`t copy text!