प्रवचने – गुरु कशाला हवा ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील. मी ‘राम राम’ म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. ‘मी’ केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्‍गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला ‘गुरू कर’ म्हणून सांगितले.

संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे ? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परिक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्यावरून आपण संताची परिक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे, त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरू‍आज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू.

काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्‍गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत; ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे ? सद्‍गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले, ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा, त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे; तेच करावे आणि आनंदाने रहावे.

भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.


Back to top button
Don`t copy text!