प्रवचने – अखंड समाधानाचा मार्ग !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


चित्तात राखावे समाधान ॥

चित्तांत ज्याचे राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥

ज्याचा विश्वास रामावरी । त्याला समाधान स्वीकारी ॥

माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥

दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला । त्याला देह प्रारब्धावर टाकता आला ॥

प्रारब्धाने देहाची स्थिती । हे सर्वच सांगती ।

पण त्यात मानता येते सुख समाधान । ध्याता एक रघुनंदन॥

तात्पुरते काही तरी औषध घ्यावे । देहाच्या लोभात न सापडावे ॥

माझे सांगणे दुजे नाही । जोवर श्वासोच्छ्‌वास देही । तोंवर मुखी नाम पाही ॥

तरीपण मी सांगतो एक । ठेवावा रामावर विश्वास । तोच साह्यकारी होईल खास ॥

असावे शुद्ध आचरण । करावे भगवंताचे स्मरण ॥

कर्तव्याची ठेवावी जागृति । त्यात भगवंताची राखावी स्मृति ॥

नामाविण नाही दुजे साधन । हे सांगत आले सर्व संतजन ॥

देहाचे अस्तित्व भगवंतासाठी । याहून नाही दुजी उच्च प्राप्ति ॥

देहाचे भोग देहाचे माथी । ऐसे सर्व सांगती ।

परि एक वाटतसे चित्ता । ते दूर होईल एक भगवंत चिंतिता ॥

भगवंतावाचून देहाचे सुखभोग । हे न मानिती साधुसज्जन ॥

आता जगणे रामासाठी । हा निश्चय मानावा चित्ती ॥

जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ति । लौकिक आणि कीर्ति ।

हे परमात्म्यावाचून मातीमोल साधुसंत गणती ॥

आजवर झाले कष्ट फार । देहाचा भरवसा धरून थोर ॥

देहाचे सुखसौख्य आदरसत्कार । हे प्रारब्धाधीन सत्य जाण ॥

मुलींनी खेळ मांडला । परि नाही कामाला आला ।

तैसा प्रपंची थोर झाला । परमात्म्याचा तो न म्हणावा भला ॥

रामापरते सत्य नाही । श्रुतिस्मृति सांगतात हेच पाही ॥

आता न ठेवावा जगी भरवसा । राम सखा करावा खास ॥

रामाविण अन्य प्रीति । उपजे देहबुद्धीचे संगती ॥

आता रामा एकच करी । तुझा विसर न पडो अंतरी ॥

आता जसे असेल तसे होऊ द्यावे । रघुनाथभजनी असावे ॥

मागील झाले होऊन गेले । पुढील येणार येऊ द्यावे भले ॥

आता न धरावा हव्यास । हेच वाटे जीवास ॥

जे जे करणे आणिले मनी । रामकृपे पावलो जगी ।

माझे आता काही । दुसरे मागणे नाही ॥

माझे कोणी नाही । मी कोणाचा नाही । जग आणि देह अगदी माझे नाही ॥

जे जे काही दृश्य पहावे । त्याचे रूपांतरच व्हावे ।

हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती । समाधानाची होय प्राप्ति ॥

जोवर श्वासोच्छ्‌वास देही । तोवर मुखी नाम पाही ॥


Back to top button
Don`t copy text!