प्रवचने – गुरुआज्ञापालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला, तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले, तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर सोपवून तुम्ही मोकळे झाला, गुरुआज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कुठे ?

विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच; त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणले पाहिजे; परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण ‘जाणतो’ म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरूप व्हायला ? यालाच ‘साधू होऊन साधूस ओळखणे’ किंवा ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ असे म्हणतात. आता, कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघातरूपाने उद्‍भूत होतात; नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्मरूपाला विरोधी असे संस्कार घालवून, आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो, तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही.

देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे; त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे ? मी सुखाचा शोध केला, आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे, भगवंताचे अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. जे मी सुरुवातीला संगितले तेच मी शेवटी सांगतो : तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे ?

आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे. न होईल त्याचा राम कैवारी आहे.


Back to top button
Don`t copy text!