मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक ‘माझा प्रपंच पूर्ण आहे ‘ म्हणून सांगणारा भेटेल, परंतु ‘चालले आहे असेच चालावे, यात कमी तर नाही ना कधी पडणार?’ अशी त्याला काळजी असतेच; म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी, त्याला कदाचित् काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते, आणि तो आपल्याच धुंदीत, आनंदात असतो; पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातले सुख परावलंबी, विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधी तरी जाणार; निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे, विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार ? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील ? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते, आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते.
तर मग सुख कशात आहे ? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे, सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच, म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषयसुख आहे; त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता ? मी कोण, कशासाठी आलो, असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच; कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे, हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठुन, कसे येणार ? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानीत नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो. देवाची भक्ति करणे, संतांकडे जाणे, हे सुद्धा विषय मिळविण्याकरिता आपण करतो; मग ही आपली सेवा, भक्ति विषयांची झाली का संतांची ? देव, संत, यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळविण्याचे साधन म्हणून नाही का आपण करीत ? मांजर आडवे गेले की, आपले काम होणार नाही, ही भगवंताची सूचना आहे, असे समजून आपण परततो; पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो ! सारांश, आपले ध्येयच विषय हे असते, आणि ते मिळविण्याची आपली खटपट असते. खरोखर, जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरीत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.