प्रवचने – प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानीत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात. आणि त्याला ‘हा व्यवहार आहे’ असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही, तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली, त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही, त्याला बुवापणाही नाही करता येणार ! कर्ज फार झाले म्हणून प्रपंच मोडला, यात कोणता स्वार्थत्याग आहे ? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले, तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली. जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली, तर मग घरदारानेच काय केले होते ? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते ? हा प्रपंच, हा संसार, जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे, तर तो कोणाला तरी सुटेल काय ? जो आसक्तिच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वरमहाराजांनासुद्धा संसार, प्रपंच होता; पण त्यामध्ये त्यांची आसक्ति नव्हती, म्हणून त्यांना तो बाधला नाही.

पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू, हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची ? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले, ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्या वेळी भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. चित्त शुद्ध करून विचार करावा, आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे. विषयापासून वेगळे व्हावे, म्हणजे हे पाहता येते. व्यसनी माणसाने, व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुतिरायाच्या दर्शनाला मी पूर्वी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही होत नाही, याला काय करावे ? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात ? मग जे पोटाकरता करता ते भगवंताकरता का नाही करीत ? भगवंताला शरण जाणे सर्वांत सोपे आहे; त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरूरी नाही लागत. माझ्या मनांत येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे ‘मी त्याचा झालो’ असे म्हणणेच होय. ‘मी रामाचा झालो, जे जे होते ते राम‍इच्छेने होते’ असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही.

प्रपंचाला ‘माझी’ गरज आहे, आणि ‘मला’ भगवंताची गरज आहे.


Back to top button
Don`t copy text!