प्रवचने – भवरोगापासून मुक्ततेचा उपाय – सत्संगती व नामस्मरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एका गावात एक वैद्य राहात होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की, ” तुला एक भारी रोग झाला आहे; पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन तसे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल.” वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का ? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात, त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का ? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संतसंग करा आणि नामात रहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल ? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की, नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे ? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे; तरी त्याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना, ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे. त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल.

एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, “भगवंताची पूजा आणि भक्ति कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो.” त्याला विचारले, “ते कसे ?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते; मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही. म्हणजे आपलेपण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निःस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे.” याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे.

अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ति जन्म पावते.


Back to top button
Don`t copy text!