प्रवचने – मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एका गावात चोरांची एक सभा भरली. तीत काही चोर म्हणाले की, लूट करायची ती हानी करून करावी; तर काहींचे असे म्हणणे पडले की, कुणाला उगीच मारायला नको, नुसतीच लूट करावी; पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते ! तसे आपले होते. एक म्हणतो, व्यवहारदृष्टया प्रपंच करावा; दुसरा म्हणतो, तसे नव्हे, योग्यअयोग्य पाहून प्रपंच करावा; तर तिसरा म्हणतो, स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा; परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कुणीच म्हणत नाही ! सगळयांना प्रपंच ‘हवा’ आणि ‘देव असला तरी चालेल.’ म्हणजे प्रपंच तेवढा खरा, असे ते मानून चालतात, देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो. वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो. असा एक दारूडा गाणे गात असताना दुसरा दारूडा त्याला म्हणू लागला की, ‘अरे, हे असले गाणे काय म्हणतोस ? तुला काही कळत नाही.’ नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारूड्याने दुसऱ्या दारूड्याला विचारला ! त्याप्रमाणे, प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते, आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात. आपला प्रपंचातला व्यवहार असा असतो.

‘आम्हांला बंधने नकोत’ असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर, नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालकाइतकीच सुखाची असते; उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी. पण स्वतः लबाडी करू नये; म्हणजेच, आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे.

व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसेच जास्त भेटली. ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात; त्यांचे पाप मध्यम, पुण्य मध्यम, आणि परमार्थदेखील मध्यमच असतो. असा मनुष्य वेळप्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावे, तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच.

नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अब्रुने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!