तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यांपैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे ? ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे. कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही; कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो; कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आणि म्हणतो की, माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईन. पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते. म्हणजेच, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ? प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा; पण तो सुखाचा कसा होईल हे पाहात जावे. मी तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे; ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही. याकरिता रामाला अनन्यभावे शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीतच असते, आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. आपण भगवंताला म्हणावे, ‘भगवंता, मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंच हा तुझाच आहे. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही. तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील होईन.’ अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात राहावे.
तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते तुम्हांला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. जे संतांनी सांगितले आहे तेच मी सांगतो; ते सत्य आहे असे मनापासून समजा, खरोखर राम तुम्हांला सुखी करील. तुम्हांला माझा आशिर्वाद आहे की तुम्हांला भगवंताचे प्रेम खात्रीने लाभेल.