नामाशिवाय जो जो विश्वास । ते ते अविश्वासाचे कारण आहे खास ॥
नामाविण मानी सत्य । नाही त्याने जोडला भगवंत ॥
नामाविण मानी जग । त्याचा होऊ देऊ नये विटाळ ॥
नामाची जेथे मस्ती । तेथे रामाची वस्ती ॥
याहून जे जे वाटले सुख । ते तेच दु:खाला कारण ॥
देवळे सभामंडपे न येत कामा । ज्याने नाही ठेविले हृदयी रामा ॥
राम करून घ्या आपुलासा । तोडा तोडा जन्ममरणाचा फासा ॥
राम एक दाता । त्याचेवाचून नाही कोणी देता ॥
नामाचे अनुसंधान । प्रपंचात सर्वांचे समाधान ॥
जे जे होईल समाधानाचेच कारण । रामास व्हावे अर्पण ॥
मोह ममता देहाचा अभिमान । हा संसाराचा पसारा जाण । तेथे ठेवू नये मन ॥
नाही देहाला कष्ट देऊ । अनुसंधान न द्यावे बिघडू ॥
नामात आहे समाधान । हा विश्वास ठेवावा पूर्ण ॥
मी मागतसे एक दान । ते द्यावे तुम्ही सर्वांनी ॥
नामापरते नका मानू सुख । रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण ॥
याहून नको मज काही । एवढी भीक घालावी सर्वांनी ॥
व्यवहार लौकिक विषयाची आवड । हेच परमार्थाला मुख्य येई आड ॥
त्यांना सारावे बाजूस । एक भजावे भगवंतास ॥
नाही सत्य मानू जगी काही । रामाचा आसरा घ्यावा हृदयी ॥
जोपर्यंत देहाचा संबंध । तोपर्यंत लौकिकाची चाड ॥
प्रपंचाच्या थोडया सुखासाठी । नाही अंतर देऊ जगजेठी ॥
चार वेद सहा शास्त्रे । सर्व केल्या स्मृति पारायण ।
तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर । तोवर तेथे कोठे समाधान ? ॥
सर्व शास्त्रांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
नामी ठेवावे लक्ष पूर्ण । तेणे होईल समाधान ॥
नामाची धरावी कास । देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ।
हे सर्व साधे राखता अनुसंधान ॥
आता करण्याचे उरले काही । हे किंचितही न आणावे मनी ॥
मनाने व्हावे रामार्पण । सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण ॥
चित्त ठेवावे रामापाशी । ध्यास असावा त्याचा अहर्निशी ॥
देहाने नाही करता आले । मन रामापायी गुंतवले । रामाने त्याचे कल्याण केले ॥
राम ठेवील त्यात समाधान । हेच खरे भक्तीचे लक्षण जाण ॥
गुरूकडून घेतलेले नाम । पावन करील जगास ।
हाच ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥
देहाची स्थिती । कायम न राहे निश्चित ॥
ते सांभाळणे आहे जरूर । न विसरता रघुवीर ॥
रामा तुझ्याकरिता राहिलो । हा भाव ठेवावा निश्चित ।शक्य तो स्मरावा रघुपति ॥