प्रवचने – प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टींत केव्हांही समाधान मिळणार नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सर्व अनुभवांत आत्मप्रचीती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचीतीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का ? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का ? आपण असा विचार करावा की, आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे ! हे आपले ‘हवेपण’ केव्हा संपणार ?

आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टरकी; नोकरी करणारा, मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा अशीलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करीत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्ष्येने तो ते करीत असतो. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते; त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की, आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही, असे काही वाटत नाही. आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल, याची विवंचना कायमच ! एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का ? लग्न झाल्यावर, समजा पाच वर्षे मूल झाले नाही, तरी हा काळजी करतोच; आणि समजा, मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहेच ! तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत. त्यांतून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे ? ह्या गोष्टी एकांतून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या, त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यांतून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत, त्यातून पूर्णस्वरूप असलेले समाधान कसे लाभेल ? समजा, एका वेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेत; जर कुणी म्हणाले की आता आणखी शंभर वेडे आले की एक शहाणा त्यांतून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का ?

मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही.


Back to top button
Don`t copy text!