प्रवचने – ‘मी कोणीतरी आहे’ ही वृत्ती घातक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला, की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ, देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यतः साठविलेले आहे. या दोन गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशाचा विचार करता असे दिसले की, आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही, आणि त्याचा लोभही नाही. आता दुसर्‍याला पैसा द्यायचे म्हटले, म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केलाच पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी होईल; नंतर पैसे मिळविणे, आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे. पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसर्‍याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला, तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल, आणि दुसर्‍याला पैसा देण्याची बुद्धी मारील. म्हणजे परिणाम असा होणार की, दुसर्‍याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणा मात्र आधी नसलेल्या पैशाचा लोभ उत्पन्न झाला. ह्यात दुसर्‍याचे काम तर नाहीच, आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदुःखाची. ज्याची देहबुद्धी मेलेली आहे, त्याला दुसर्‍याच्या देहदुःखाची जाणीवच होऊ शकत नाही. म्हणजे दुसर्‍याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःचे ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल. समजा इतके केले, आणि दुसर्‍याचे देहदुःख निवारले, तरी त्याला पुनः देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल ? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल ? म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येणार नाही, आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी तर करता येणार नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन, नुकसान मात्र पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना केली की, असल्या गोष्टी करण्याची शक्ति आणि बुद्धी मला देऊ नकोस.

बालपणाची सरल वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा, आणि दुसरे विद्या. दोन्हींपासून ‘मी कुणीतरी श्रेष्ठ आहे’ ही वृत्ती उत्पन्न होते, आणि ती घातक असते. ‘मी कुणीतरी आहे’ असे वाटण्यापेक्षा ‘मी कुणाचा तरी आहे’ असे वाटणे हिताचे आहे. जगातले अत्याचार, अनीति, अधर्म, असमाधान, या सर्वांचे कारण हेच की, मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो.

आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,
असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.


Back to top button
Don`t copy text!